पुणे : भोगी, मकर संक्रांतीमुळे बोरांची आवक जास्त झाली होती. तरीदेखील मागणी जास्त असल्यामुळे बोरांच्या भावात २० टक्क्यांनी वाढ झाली, तर लिंबाच्या भावातही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. १२) जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी ३० ते ४० टन, संत्री ५० ते ६० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १८ ते २० टेम्पो, लिंबांची सुमारे २००० गोणी, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू एक हजार बॉक्स, पेरू ३०० ते ४०० क्रेट, अननस ६ ट्रक, सीताफळ २ ते ३ टन, बोरांची साडेसात ते आठ हजार गोणी इतकी आवक झाली होती.