पुणे : शहर पोलीस दलातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर

पुणे – पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह कोथरूड ठाण्यातील पोलीस निरीक्षक मेघश्‍याम डांगे आणि विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. शिसवे आणि डांगे यांना कौशल्यपूर्ण सेवेबद्दल, तर पवार यांना शौर्य पदक देण्यात येणार आहे.

पुणेकर करोनाशी लढा देत असताना शिसवे यांनी पोलिसांच्या पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची मे 2019 मध्ये सह पोलीस आयुक्त म्हणून पद्दोन्नत्ती झाली होती. शिसवे हे 2008 च्या बॅचचे आयपीएस आहेत. शिसवे यांना यापूर्वी अंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सर्व्हिस पदक मिळाले आहे. आतापर्यंतच्या सेवाकाळात त्यांना 55 बक्षिसांनी गौरविण्यात आले आहे. सेवा करीत असताना अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामाना करण्यासाठी आवश्‍यक असलेली अद्ययावत कौशल्य मिळवण्यासाठी शिसवे यांनी आतापर्यंत तीन वेळा परदेशांत प्रशिक्षण घेतले आहे.

गजानन पवार यांनी आतापर्यंत मुंबई, नागपूर, राज्य शासनाचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि शहरातील गुन्हे शाखेत उत्कृष्टपणे कर्तव्य बजावले आहे. पोलीस दलात त्यांना आतापर्यंत एकूण 475 बक्षीसे मिळाली आहेत. 2011 साली त्यांना पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह आणि 2019 साली राष्ट्रपतींचे पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मेघश्‍याम डांगे हे 1992 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी नागपूर, नाशिक ग्रामीण, ठाणे शहर, धुळे, नंदूरबार याठिकाणी सेवा बजावली आहे. ठाणे येथे नेमणुकीस असताना बनावट क्रेडिट कार्ड तयार करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला त्यांनी अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून एक हजार बनावट कार्ड जप्त करण्यात आले होते.

देवेंद्र पोटफोडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक – 
अग्निशमन सेवेतील वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना  राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांना यापूर्वी 2011 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. 2006 ते 2008 या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून अनेक जनजागृतीपर उपाययोजना केल्या आहेत. सीरम इन्स्टिट्यूट येथील आग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. कॉमनवेल्थ युथ गेम्स स्पर्धेदरम्यान सुरक्षेची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. एमआयडीसीतल्या धोकादायक व ज्वलनशील रासायनिक उद्योग असलेल्या कार्यक्षेत्रात त्यांनी कर्तव्य निभावले आहे.

कारागृहातील तिघांना सुधारसेवा पदक –
महाराष्ट्र कारागृह विभागातील तीघांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेबाबतचे सुधारसेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. हवालदार बबन नामदेव खंडाळे(बुलढाणा जिल्हा कारागृह), संतोष बाबला मंचेकर (भायखळा जिल्हा कारागृह) आणी उत्तम विश्‍वनाथ गावडे(भायखळा जिल्हा कारागृह) अशी त्यांची नावे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.