लहान मुलांसाठी 43 हॉस्पिटल्समध्ये 6 हजार बेड
पुणे – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक बाधा होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी महापालिकेने शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये तब्बल 5 हजार 971 बेडचे नियोजन केले आहे. त्यात 252 आयसीयू, तर 82 व्हेंटिलेटर बेडची सुविधा असेल. त्यासाठी हॉस्पिटलला तयारी ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
महापालिकेने मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर, 200 बेडचे रुग्णालय, तसेच जम्बो हॉस्पिटल आणि दळवी रुग्णालयातही स्वतंत्र आयसीयू आणि बेडची सुविधा सज्ज ठेवली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील सक्रीय बाधितांचा आकडा पाहिल्या लाटेच्या तुलनेत जवळपास तिप्पट होता. आता ही दुसरी लाट ओसरत असतानाच आता करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेनेही खबरदारीचा उपाय म्हणून तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन बेड, लहान मुलांचे आयसीयू तसेच व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात येत आहेत. महापालिकेने पहिली लाट ओसरताना तब्बल 3 हजार बेडची तयारी ठेवली होती.
मात्र, प्रत्यक्षात अचानक रुग्णसंख्या वाढतच गेल्याने तब्बल 15 हजार बेडची सुविधा निर्माण करावी लागली. त्यामुळे प्रशासनाला तसेच आरोग्य यंत्रणेला धावपळ करावी लागली. त्यामुळे आता महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे.
महापालिकेचेही सव्वादोन हजार बेड
तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेनेही तब्बल 2,287 बेड तयार ठेवले आहेत. त्यात 1,707 ऑक्सिजन बेड, 245 व्हेंटिलेटरसह आयसीयू बेड, तर 198 आयसीयूविरहित बेडचा समावेश आहे. याशिवाय सीओईपी जम्बो कोविड सेंटर येथे लहान मुलांसाठी विशेष कक्ष, येरवडा राजीव गांधी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था असणार आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.