पुणे : जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी दररोज हजारो नागरीकांची ये-जा सुरू असते. यामध्ये, वकील व पक्षकारांची संख्या सर्वाधिक आहे. वकिलांसह पक्षकार न्यायव्यवस्थेचा पाया आहे. न्यायालय परिसरात विकासकामे सुरू असल्याने वाहन पार्किंग, डबा खाण्यासाठी पुरेशी जागा, बसण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे.
न्यायालयातील हे प्रश्न सोडविण्यासह वकील व पक्षकारांना पिण्याच्या पाण्यासह पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य राहिल, अशी ग्वाही पुणे बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर उपस्थित वकील बांधव-भगिनींना दिली.
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील अशोका सभागृह येथे पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष अॅड. झंजाड बोलत होते. कार्यक्रमादरम्यान असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अॅड. संतोष खामकर यांनी अॅड. झंजाड यांचा पगडी, गाऊन, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पदभार सोपविला. तसेच, अन्य पदाधिकार्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी, व्यासपीठावर निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे बार असोसिएशनचे मावळते व नवनियुक्त पदाधिकारी यांच्यासह कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळते उपाध्यक्ष अॅड. पवन कुलकर्णी यांनी केले. मावळते उपाध्यक्ष अॅड. कुमार पायगुडे यांनी आभार मानले.