पुणे – गोड, आंबट चवीची रंगाने लाल चुटूक असलेल्या स्ट्रॉबेरीची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात सुरू झाली आहे. ही हंगामपूर्व आवक आहे. दरवर्षी स्ट्राॅबेरीचा हंगाम दिवाळीनंतर सुरू होतो. साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्ट्राॅबेरीचा हंगाम सुरू होतो.
सातारा जिल्ह्यातील वाघोली गावातील शेतकरी विनोद भोईटे यांनी शुक्रवारी मार्केट यार्डातील फळ व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांच्या गाळ्यावर ३० किलो स्ट्राॅबेरी विक्रीस पाठविली. शहरातील माॅलला फळे पुरविणारे व्यापारी नानासाहेब झेंडे यांनी प्रतिकिलो ३५१ रुपये दराने ३० किलो स्ट्राॅबेरीची खरेदी केली, अशी माहिती जय शारदा गजानन पेढीचे पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.
स्ट्राॅबेरीची लागवड सातारा जिल्ह्यातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात केली जाते. अलिकडच्या काळात नाशिक जिल्ह्यातही लागवड झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे स्ट्राॅबेरीची लागवड चांगली होेण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्ट्राॅबेरीची आवक सुरू होईल.
हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारात आठ ते दहा टन स्ट्राॅबेरीची आवक बाजारात होते. स्ट्राॅबेरीला सर्वाधिक मागणी नाताळात असते. पुण्यातील फळ बाजारातून बेंगलोर, चेन्नई, गोवा गुजराथ, दिल्ली, बंगळुरू येथे स्ट्राॅबेरी विक्रीस पाठविली जाते, असे त्यांनी नमूद केले.
“स्ट्रॉबेरीची हंगामपूर्व आवक सुरू झाला आहे. हळूहळू आवक वाढणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही आवक सुरू राहणार आहे. पर्यटन स्थळाच्या ठिकाणाहून स्ट्रॉबेरीला जास्त मागणी असते.” – माऊली आंबेकर, व्यापारी, मार्केट यार्ड