पुणे/तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयास जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून स्थलांतरास तात्पुरती स्थगिती दिली आहे. तर काही कार्यकर्त्यांनी निबंधक कार्यालय स्थलांतरणाचीही मागणी केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर विरोधात शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ व शिवसेनेच्या चेतना ढमढेरे यांनी उपोषण केले होते. प्रभारी दुय्यम निबंधक अशोक सोडणवर यांनी उपोषणकर्त्यांना वरिष्ठ अधिकारी योग्य तो निर्णय घेणार असल्याबाबतचे लेखी पत्र दिल्यानंतर गुरुवारी (दि.9) रात्री 11च्या सुमारास उपोषण मागे घेतले. त्यानुसार सोमवारी (दि. 13) सायंकाळी उशिरा उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख व जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पाटील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाची स्थळपाहणी पाहणी केली.
नोंदणी महानिरीक्षक यांना झालेल्या चर्चेची माहिती देऊन त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे वरिष्ठांचा पुढील आदेश येईपर्यंत स्थलांतर स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे. यावेळी ऍड. सुरेश भुजबळ, ऍड. दिपक ढमढेरे, ऍड. सुहास ढमढेरे, ऍड. नितीन ढमढेरे आदी उपस्थित होते.
सोयीसाठी कार्यालय स्थलांतरित व्हावे…
सद्यस्थितीत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा नाही. त्यामुळे हे कार्यालय प्रशस्त जागेत स्थलांतरित करावे, अशी मागणी मार्तंड ढमढेरे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, ऍड. विश्वास ढमढेरे, ऍड. यशवंत ढमढेरे, संचालक सुदीप गुंदेचा, रमेश भुजबळ यांनी निवेदनाद्वारे दुय्यम निबंधक अनिता कणसे यांच्याकडे केली आहे.