पुणे : पोस्ट कोविड रुग्णांचा उपचारांविना मृत्यू

ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर


जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून प्रश्‍न उपस्थित

पुणे – जिल्ह्यातील करोना संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी बाधित रुग्णांना नंतर उपचार देण्यासाठी ग्रामीण भागात “पोस्ट कोविड सेंटर’ सुविधेचा अभाव असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातून क्‍लिनिक सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा बैठक झाली. त्यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, कृषी सभापती बाबूराव वायकर, समाजकल्याण विभाग सभापती सारिका पानसरे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना करोनातून बरे झाल्यानंतर उद्‌भवणाऱ्या आजारांबद्दल रुग्णालयाकडून सांगण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना पोस्ट कोविड उपचाराची गरज गरज आहे. परंतु, जिल्ह्यात सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, रुग्णांचे उपचाराभवी मृत्यू होत आहे, अशी माहिती बुट्टे पाटील यांनी सभागृहात दिली.

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली असून, सध्या रुग्ण कमी असल्याने त्यांना काम नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पोस्ट कोविड रुग्णांची माहिती गोळा करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात पोस्ट कोविड सुविधा सुरू करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत आऊटसोर्सिंग केलेल्या नाष्टा, जेवण किंवा अन्य सोयीसुविधा पूरवणाऱ्या कंत्राटदाराला अद्याप बिले दिलेली नसल्याचा प्रकार बुट्टे पाटील आणि आशा बुचके यांनी निदर्शनास आणून दिला.

आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड केअर क्‍लिनिक
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील कंत्राटदारांची बिले देण्यात आली आहेत. ज्यांची बिले राहिली असल्यास ती देण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. आता जिल्ह्यात आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड केअर क्‍लिनिक सुरू करून सेवा दिली जाईल.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.