पुणे, दि. 25 -एसटी महामंडळाच्या संपामुळे एसटीची पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सेवा बंद पडली होती. त्यामुळे पीएमपीएलकडून या भागात बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र एसटीने पुन्हा या भागात सेवा सुरू केल्याने पीएमपीने जिल्ह्यातील 11 मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ही सेवा बंद करताना बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बस सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू करणाऱ्यांना गोरगरिबांची मुलं शिकावीत, असं वाटत नाही का, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या मार्गांवरील बस सेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, दौंड तालुक्यातील पाटस, मुळशी तालुक्यातील पौडपासून मुठा गाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पानशेत, वरसगाव या मार्गांवर गेल्या एक दीड वर्षांत पीएमपी बस सेवा सुरू करण्यात आली. एसटीची अपुरी सेवा आणि खासगी वाहनांचे भरमसाट भाडे अशा कात्रित सापडलेल्या या भागातील शेकडो प्रवाशांना बस सेवा सुरू झाल्यामुळे मोठा आधार मिळाला आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, दूर अंतरावर काम करणारे कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी शहरात जावे लागणारे रुग्ण इतकेच नाही, तर मार्केट यार्ड आणि मंडईमध्ये नित्यनेमाने येणारे किरकोळ भाजी विक्रेते तसेच शेतकऱ्यांनाही या बसचा मोठा आधार निर्माण झाला आहे, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस सेवा कायम ठेवा. त्या बंद झाल्यास अथवा ज्या बंद केल्या आहेत, त्या मार्गावरील बस सेवा पुर्ववत सुरू कराव्यात. या आंदोलनात मी स्वतः उतरेन याची कृपया आपण नोंद घ्यावी, असा इशारा खासदर सुळे यांनी दिला आहे.
“सुळेंनी अभ्यास करावा’
लॉकडाऊन आणि एसटीच्या संपामध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीने ग्रामीणमध्ये सुरू केलेले 11 मार्ग बंद केले आहेत. त्याबाबत एसटीनेच पीएमपीला पत्र दिले. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी अभ्यासपूर्ण सर्व माहिती घेतली, तर त्यांची निम्मी आंदोलने कमी होतील, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. ग्रामीण भागातील पीएमपीने बंद केलेले 11 मार्ग तत्काळ सुरू करावे, अन्यथा आंदोलन करू असा पवित्रा खासदार सुळे यांनी घेतला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यांनी सुळे यांना शांत बसून सर्व माहिती घेण्याचा सल्ला दिला. एसटीच्या संप काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीकडून हे मार्ग सुरू करण्यात आले होते. आता एसटीची सेवा सुरू झाली असून, पीएमपीने हे मार्ग बंद करावे, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.