नियम मोडणाऱ्याविरोधात पुणे पोलीस आणखी कडक भूमिका घेणार – पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम

पुणे (प्रतिनिधी) – शहरात संचारबंदी असतानाही अनेक भागात नागरिक रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तरीही काही नागरिक गांभिर्याने घेत   नाहीत. त्यामुळे नियम मोडणाऱ्याविरोधात पुणे पोलीस आणखी कडक भूमिका घेणार असल्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या काळातही नागरिक रस्त्यावर बाहेर पडत आहेत. किराणा सामान खरेदी, भाजीपाला, दूध आणणे आदी विविध कारणे सांगून घराबाहेर पडणाऱ्याची संख्या वाढत आहे. दरम्यान, विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यावर कडक कारवाई करावी असे आदेश बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, शहरातील प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी पार पडली. पुणे शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे, नागरिक रस्त्यावर येवू नयेत त्यांनी गर्दी करू नये यासाठी पोलीस दलाकडूनही शहरातील विविध चौक, महत्वाचे रस्त्यांवर बॅरिकेडस लावून नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांनी गस्तही वाढविली आहे.

रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अनेक भागात संचारबंदीचे नियम मोडून विनाकारण फिरणाऱ्या चालकांचे सुमारे दोनशे वाहनेही जप्त करण्यात आली आहे. शहरातील स्वारगेट जवळील एका भागात कोरोना बाधित दोन रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. त्या भागात जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच तेथे नागरिकांनाही रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीही लोक विविध कारणे देत फिरत असल्याचे दिसून येत असल्याचेही डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.