पुणे – शहर परिसरात अवैध सावकारी करून पैसे वसूल करण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांकडून अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. यानूसार पुणे पोलिसांकडे वर्षभरात अठरा गुन्हे दाखल आहेत. सावकारीबाबत नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी पोलिसांनी ९१४५००३१०० हेल्पलाईन नंबर सुरू केला असून यावर आता व्हॉटसअॅपव्दारेही तक्रार नोेंदविता येणार आहे.
शहरात मागील काही महिन्यांपासून अवैध सावकारकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामाध्यमातून नागरिकांकडून पैसे वसूल करण्यात येत आहेत. यावर कारवाईसाठी पोलिसांनी खास पथके तयार करून कारवाई सुरू केली आहे. यानूसार शहरात १ जानेवारी ते आजवर एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सावकारी कायदा कलम व भारतीय दंड विधान कलमाअंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. अशाप्रकारे सावकार नागरिकांकडून अवैधरित्या पेैसे वसूल करीत असल्यास याबाबत आता तक्रार करणे सोपे झाले आहे.
नागरिकांना सहजरित्या तक्रार नोंदविता यावी, यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटसअॅप नंबर सुरू करण्यात आला आहे. या नंबर नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. नागरिकांना सावरकीबाबत काही तक्रार असल्यास या नंबरचा वापर करून तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.