पुणे – अनलॉक-2 सुरू होताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यावर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असतानादेखील काही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा कडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अघोषित लॉकडाऊन असल्याची परिस्थिती आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या नवीन कंटेन्मेंट परिसरात नागरिक बेशिस्तपणे वावरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत प्रतिबंधित क्षेत्र आणि परिसरातील 692 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात विनापरवानगी फिरणारे, ट्रिपल सीट फिरणारे, सिग्नल तोडणारे, फुटपाथवर गाड्या पार्क करणाऱ्यांचा समावेश आहे.
शहरात सध्या 94 ठिकाणी नाकाबंदी सुरू असून 85 अधिकारी, 337 कर्मचारी असे मिळून 422 पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी आहे त्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शहरात वाहतूक शाखेतर्फे ज्या कारवाया केल्या जात होत्या, त्या सर्व पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
दि. 1 जुलैनंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर त्यातून नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गरजांची पूर्तता करणे अपेक्षित आहे. करोना विषाणू संसर्गाचा धोका अजून टळला नसून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतत पालन होणे अत्यावश्यक आहे. मात्र, सर्व नागरिकांनी मास्क परिधान करणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य आहे. शिवाय स्वयंशिस्त पाळावी. गरजेच्या कामांसाठीच घराबाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त