पुणे – मित्राचा अचानक फोन आला वडिलांचे गावी निधन झाले आहे. लॉक डाऊनमुळे असलेल्या संचारबंदी काळात कुटुंबीयांना घेऊन अर्जंट गावी जायचे आहे काय करता येईल? पोलीस परवानगी देतील का? मला अंत्यविधीला जाता येईना? अतिशय भांबावलेल्या अवस्थेत दुःखद प्रसंगात पुणे विपश्यना समितीचे प्रमुख डॉ. दत्ता कोहिनकर यांना त्यांच्या मित्राने फोन केला होता.
डॉ. कोहिनकर यांनी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना फोन करून सदर बाबतीत काय मदत करता येईल अशी विचारणा केली. मित्राची संपूर्ण माहिती कोहिनकर यांच्याकडून मोराळे यांनी व्हाट्सअप वर मागून घेतली. तासाभरातच पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सर्व माहितीची खातरजमा करून सदर मित्राला अंत्यविधीसाठी आवश्यक असणारा विशेष सवलत पास तयार करून मेल केला.
कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस देखील दिवस रात्र बंदोबस्तावर जीव धोक्यात घालून उभे आहेत. पुण्यातून जळगाव येथे मित्राला वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी पुणे पोलिसांनी एका तासाभरातच कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली. पोलिसांचा कर्तव्यतत्परते मुळे योग्य वेळेवर त्यांच्या मित्राला कुटुंबीयांसह अंत्यविधीसाठी वेळेत पोहोचता आले. या कठीण प्रसंगी पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांच्या मित्रासह डॉ. कोहिनकर यांनी पुणे शहर पोलिस दल यांचे मनापासून आभार मानले.