जुळ्यांना टाकणाऱ्या ‘पाषाण’ हृदयी आई-बापाचा असा घेतला पोलिसांनी शोध

पुणे : गेल्या मंगळवारी पुण्यातील सुतारवाडी येथील पाषाण लेक परिसरात असलेल्या एका कचरा डब्यामध्ये स्त्री जातीचे आणि पुरूष जातीचे असे दोन नवजात अर्भक सुरक्षारक्षकांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यामध्ये चतुःश्रृंगी पोलिसांना यश मिळाले असून पोलिसांनी नवजात अर्भक कचरा कुंडीत फेकणाऱ्या पालकांना जेरबंद केले आहे.

…असा घेतला शोध

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पाषाण लेक परिसरातील कचरा कुंडीमध्ये नवजात अर्भके आढळून आल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी शहरातील विविध रुग्णालयांना भेटी दिल्या असता कर्वेनगर परिसरातील जननी नर्सिंग होम येथे १३ जानेवारीच्या पहाटे एका महिलेने पुरुष व स्त्री जातीच्या जुळ्या अर्भकास जन्म दिल्याची माहिती मिळाली. सदर महिलेने प्रसूतीनंतर रुग्णालयास कोणतीही माहिती न देता नवजात अर्भक व सोबत आलेल्या पुरुषासह पोबारा केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा त्या महिलेवरील संशय बळावला.

पुढील तपासासाठी पोलीस रुग्णालयाच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या पत्त्यावर पोहोचले मात्र सदर महिलेने वर्षभरापूर्वीच खोली खाली केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यांनतर पोलिसांनी महिलेबाबत अधिक चौकशी केली असता सदर महिला ही सध्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून शोधाशोध केल्यांनतर सदर महिला व तिचा प्रियकर संतोष नागनाथ वाघमारे पोलिसांच्या हाती लागले.

सदर महिला ही विधवा असून तिला पहिल्या पतीकडून तीन आपत्य आहेत. सध्या सोबत राहत असलेल्या प्रियकरापासून तिला आणखी दोन आपत्य झाली असून या त्यांचे पालन पोषण करण्यास असमर्थ असल्यानेच आपण नवजात बालकांना पाषाण लेक परिसरातील कचरा कुंडीमध्ये फेकल्याची कबुली संबंधित प्रेमी युगलाने दिली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सहा पोलीस अधिकारी व कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून शोध घेत होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here