पुणे – दि. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट दरम्यान पुणे पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या 7750 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 43 लाख 78 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या विरूद्ध परिवहन विभागाने देखील धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
दुचाकी असो अथवा चारचाकी वाहनाला नंबर प्लेट असणे आणि तीही नियमात असणे गरजेचे आहे. काही लोक विशेषत: युवा वर्गात फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ असते. नियमबाह्य नंबर प्लेट लावून ते शहरभर थाटात फिरत असतात. पण पोलिसांचे याकडे लक्ष असते आणि त्यावर दंडात्मक कारवाई देखील करू शकतात, याचे भान या युवकांना नसते.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नंबर प्लेट इंग्रजीमध्येच असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जड वाहने व ज्या वाहनांना राष्ट्रीय परवाना आहे, त्यांना देखील इंग्रजी नंबर प्लेट असणे बंधनकारक असते. मात्र बऱ्याच वेळा नंबर प्लेटमध्ये बदल केले जातात. काही दोन नंबरचा व्यवसाय करणारी मंडळी देखील बनावट नंबरचा वापर करतात. तसेच इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांतील नंबर प्लेट वाहनाला लावणे हे देखील चुकीचे आहे. पोलीस अशा विविध भाषेच्या नंबर प्लेटवर देखील दीड हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करू शकतात.
आधी 500, नंतर दीड हजारांचा दंड –
नियमबाह्य नंबर प्लेट असल्यावर पोलिसांनी पकडले तर पहिल्यांदा 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. दुसऱ्यांदा मात्र तेच वाहन पोलिसांनी पकडले, तर दीड हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
नंबर प्लेट कशी हवी?
केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये 2005 साली बदल करण्यात आला. त्यानुसार वाहनाच्या नंबर प्लेटवर IND असे लिहीत, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असावी, असा निर्णय घेण्यात आला. ही नंबर प्लेट आरटीओकडे रजिस्टर असलेल्या व्हेंडरकडेच मिळते. आता नवीन नियमानुसार शोरुममधून वाहन बाहेर पडतानाच त्याला नंबर प्लेट लावून दिली जावी, असा नियम आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऍल्युमिनियमपासून बनवलेल्या असून, या प्लेट्समध्ये 20 बाय 20 क्रोमियमचा अशोक चक्राचा होलोग्राम आहे.