पुणे – शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका दाखल करून ती मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, यातील आरोपी राजेश बजाज व बापू शिंदे या दोघांवर उद्योगपती रवींद्र साकला यांना 50 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढत असले तरी खंडणीखोरांना गजाआड करीत पुणे पोलिसांनी अंकुश ठेवला आहे.
बांधकाम व्यावसायिकास खंडणी मागणाऱ्या राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध
याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला असून राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव (रा. अकुर, कमला नेहरू पार्कसमोर, डेक्कन जिमखाना), के. ए. कुरेशी (रा. मलकाजी वाडा, खडकी बाजार), अशोक शंकरराव जाधव (रा. राजा बंगलो, खराडी) आणि बापू गोरख शिंदे (रा. नऱ्हेगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी निखिल केतन गोखले (वय 47, रा. मयुर कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2015 ते 24 जुलै 2019 दरम्यान शिवाजीनगर कोर्ट गेट नं. 3च्या समोर रोडवर घडला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोखले यांची शशीबिंदू कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे बोपोडी येथील बांधकामाची परवानगी चुकीची आहे, याबाबत राजेश बजाज व इतरांनी मुंबई हायकोर्टात दिवाणी अर्ज केला होता. त्यावेळी तिघांनी 14 सप्टेंबर 2016 रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले.
या प्रतिज्ञापत्रात तिघांनी 20 ते 30 ऑगस्टपर्यंत राजेश बजाज यांना डेंग्यू झाला व त्यांना बेड रेस्ट घेण्यास डॉक्टरांनी सांगितले. तसेच के. ए. कुरेशी यांना व्हायरल संक्रमण झाले असल्याने सुनावणीच्या वेळी हजर राहू शकले नसल्याचे नमूद केले. त्या तिघांनी सादर केलेले मेडिकल प्रमाणपत्र हे बनावट करून दाखल केल्यामुळे कंपनीची व कोर्टाची फसवणूक केली आहे. तसेच हायकोर्टात जनहित याचिकेची फेरसुनावणी करण्याकरीता केलेल अर्ज मागे घेणेकरीता ऑगस्ट 2018 मध्ये शिवाजीनगर कोर्ट गेट नं. 3 च्या समोर रोडवर त्यांनी 1 कोटी रुपयांची मागणी करुन, शिवीगाळ करुन कंपनीसह फिर्यादी व फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर यांना संपवेन अशी धमकी दिली होती.
या चौघांनी आम्हाला जीवे मारण्याची व कंपनीच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्याची धमकी देऊन आमच्या विरोधात विनाकारण न्यायालयात अर्ज करीत होते. त्या भितीपोटी आम्ही तक्रार दिलेली नव्हती. पंरतु, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याबाबत वर्तमान पत्रामधून समजल्याने आम्ही त्याने दिलेल्या त्रासाबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो असल्याचे गोखले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. गोखले यांच्या फिर्यादीनुसार राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फ्लॅट बळकावला…
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रवींद्र नौपतलाल सांकला यांना 50 लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.