पुणे- दिवाळीनिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी पोलीस प्रशासनाने परवाने दिले आहेत. दि.27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीसाठी हे परवाने ग्राह्य असतील. या कालावधीत विक्रेत्यांना विदेशी फटाक्यांची विक्री करता येणार नाही. त्याशिवाय मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेच्या दारूची विक्री करता येणार नाही. शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामात किंवा घाऊक परवाना असलेल्यांकडे परत करणे आवश्यक आहे, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात कोणत्याही रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकराचे फटाके अथवा शोभेची दारू उडविण्यास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ज्याठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात आली आहे, तेथून 50 मीटरच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
फटाके उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर प्रामुख्याने बंदी आहे. ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णतः बंदी असणार आहे.
मात्र, जे फटाके आवाज निर्माण न करता रंग निर्माण करतात. त्यांच्यावर बंदी नसणार आहे. शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्यांचा वापर करता येणार नाही. त्यामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालच्या 100 मीटर पर्यंतचे क्षेत्र जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीसंदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.