पुणे– कोलकाता आणि बदलापूर येथील अत्याच्यारांच्या घटनांनंतर पुणे पोलीस “अलर्ट’ झाले आहेत. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. यात शाळा-महाविद्यालयातील सुरक्षा, स्कूल बस चालकांची माहिती अद्ययावतीकरण, महिलांच्या सुरक्षेसह अन्य विषयांवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.
कोलकाता येथे डॉक्टर तरूणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याच्यार केल्याची घटना घडली. या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले असून ठिकठिकाणी आंदोलने, मूक मोर्चा काढण्यात येत आहे. अशा घटनांमुळे शाळा, महाविद्यालयातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने देखील गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार ही बैठक दि. २९ रोजी होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहून शाळा, महाविद्यालयांच्या आवारातील सुरक्षेविषयी चर्चा करणार आहेत. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.