समाविष्ट 34 गावांतील जागा वर्ग; 128 एकर क्षेत्र सुविधांसाठी उपलब्ध
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील 34 गावे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांमधील अंतर्गत रस्ते, “डीपी’मधील रस्ते आणि सुविधा क्षेत्र यासाठी राखीव असलेले भूखंड पुणे पालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. या गावांमध्ये 437 भूखंड असून, जागेचे क्षेत्र 5 लाख 16 हजार 470 चौरस मीटर म्हणजे सुमारे 128 एकर आहे.
“पीएमआरडीए’च्या हद्दीतील लोहगाव, मुंढवा, हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, उत्तमनगर, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही 11 गावे 2017 मध्ये पुणे पालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यापाठोपाठ म्हाळुंगे, सूस, बावधन बु, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली ही गावे 2021 मध्ये पालिकेत समाविष्ट झाली.
34 गावांमध्ये सुविधा क्षेत्र संबधित जागामालकांनी “पीएमआरडीए’कडे हस्तांतरित केले होते. ही गावे पालिकेत समाविष्ट झाल्याने सुविधा देण्यासाठी जागांची मागणी पालिकेकडून केली होती. त्यानुसार “पीएमआरडीए’ने जागा पालिकेकडे वर्ग केल्या आहेत. “पीएमआरडीए’चे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप म्हणाले की, या 34 गावांमधील सुविधा क्षेत्र व रस्ते यासाठीचे भूखंड पालिकेकडे वर्ग केले आहेत. 2017 मध्ये पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील भूखंडाचे अभिलेख यापूर्वीच वर्ग केले आहेत. आता 23 गावांमधील भूखंड पालिकेकडे वर्ग केले आहेत. त्यासाठीचे अभिलेख व संचिका पालिका प्रशासनाकडे दिल्या आहेत.
सुविधांचा मार्ग मोकळा
पालिकेकडे वर्ग करण्यात आलेल्या या भूखंडामुळे या भागात नागरिकांना पायाभूत नागरी सुविधा निर्माण करणे शक्य होणार आहे. तसेच रस्ते तयार करणे व रुंदीकरण करता येणार आहे. यासह सुविधा क्षेत्रातील म्हणजे ऍमिनिटी स्पेसमधील जागेवर पालिकेला क्रीडांगण, शाळा, रुग्णालये, सभागृह आदी सुविधा निर्माण करता येणार आहे.