पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाची पुणे दर्शन आणि रातराणी बससेवा
24 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. करोनामुळे मार्चपासून दोन्ही सेवा स्थगित केल्या होत्या.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शहरातील विविध ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांची सफर “पुणे दर्शन’ बससेवेतून नागरिकांना घडवण्यात येते. मात्र, करोनामुळे प्रेक्षणीय ठिकाणे बंद असल्याने ही सेवादेखील स्थगित केली होती. मात्र, आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर पुणे दर्शन आणि रातराणी बससेवा सुरू होणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पुणे दर्शन बससेवा पूर्वीप्रमाणेच एसी बसद्वारे पुरविली जाणार आहे. पुणे दर्शन बससेवेंतर्गत केसरीवाडा, शनिवारवाडा, केळकर संग्रहालय, चतुश्रुंगी माता मंदिर, आंबेडकर वस्तुसंग्रहालय, पु.ल.देशपांडे गार्डन, सारसबाग गणपती, कात्रज सर्पोद्यान, शिंदेछत्री वानवडी, आदिवासी वस्तू संग्रहालय, आगाखान पॅलेस या प्रेक्षणीय स्थळांची प्रवाशी नागरिक आणि पर्यटकांना सफर करता येणार आहे.
पुणे दर्शन बससेवेसाठी 500 रुपये तिकीट आकारण्यात येणार असून, डेक्कन आणि पुणे स्टेशन मोलेदिना येथील पासकेंद्रांवर पुणे दर्शन बसचे तिकीट बुक करता येईल. यासह पीएमपीच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.
यासह 24 ऑक्टोबरपासून रातराणी सेवा पूर्ववत होणार असून, कात्रज, पुणे स्टेशन, हडपसर, निगडी आणि भोसरी डेपोतून सुमारे 10 मार्गांवर बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.