पुणे – पीएमपीएमएलच्या अनावश्‍यक फेऱ्या होणार बंद?

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तोट्यातील मार्ग आणि अनावश्‍यक बस फेऱ्या लवकरच बंद होणार आहेत. मार्ग सुसूत्रीकरणाच्या कामाला वेग आल्याने फेऱ्या रद्द होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.

पीएमपीच्या काही मार्गांवर आवश्‍यकता नसताना जादा फेऱ्या होत असल्याचे मार्ग सुसूत्रीकरणाच्या पाहणीमध्ये आढळले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तोट्यातील मार्ग आणि फेऱ्या बंद करण्यात येणार आहे.

पीएमपीएमएलच्या अनेक मार्गांवर जादा फेऱ्या सोडण्यात येत होत्या. त्याचबरोबर एकाच मार्गावर एकामागे एक बस सोडणे, मोकळ्या गाड्या धावणे, प्रवासी नसतानाही बस सोडणे, असेही घडत होते. या प्रकारांमुळे पीएमपीचे मनुष्यबळ खर्च होऊन देखील प्रवासी आणि पीएमपीला फायदा होत नव्हता.

अशा सर्व मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय पीएमपीचे तत्कालिन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी घेतला होता. त्यासाठी डेपो व्यवस्थापकांना सर्व मार्ग, फेऱ्या, प्रवासी संख्या, उत्पन्न याची पाहणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शहरातील 17 मार्ग बंद केले होते. तर काही मार्गांवरील अनावश्‍यक फेऱ्या बंद केल्या होत्या.

मात्र, मुंढे यांच्या बदलीनंतर हे काम रखडले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा या कामाला सुरुवात झाली आहे. शहरातील सर्व डेपो व्यवस्थापकांनी तोट्यातील मार्ग, अनावश्‍यक फेऱ्या यांची पाहणी केली आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 307 मार्गांवर 18 हजार पीएमपीच्या गाड्या धावतात. या मार्ग आणि फेऱ्यांची पाहणी करून एक प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच काही मार्ग व अनावश्‍यक फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीतील सुत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.