पुणे – ‘पीएमपीएमएल’ला नवीन बसेस खरेदीचे वेध

पुणे – राज्यातील लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर “पीएमपीएमएल’ प्रशासनाला बसेसच्या खरेदीचे वेध लागले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन किमान पाचशे बसेस नव्याने घेण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्याची निविदा प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार आहे. त्यानंतर आरटीओ प्रशासनाच्या नियमानुसार जुन्या बसेस टप्प्याटप्याने ताफ्यातून बाद होणार आहेत. शिवाय, प्रवाशांची संख्या आणि बसेस यांचा ताळमेळ बसविण्यासाठी खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून आणखी बसेस घेण्याचा प्रशासन विचार करत आहे.

पीएमपीएमएल बसेसच्या माध्यमातून दररोज किमान साडेबारा ते तेरा लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्या माध्यमातून प्रशासनाला दररोज किमान दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल मिळतो. प्रशासनाच्या ताफ्यात मालकीच्या चौदाशे आणि खासगी ठेकेदारांच्या नऊशे अशा 2300 बसेस आहेत. त्यातील बहुतांशी पंधरा वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. त्यामुळे त्या मार्गावर आणता येत नाहीत. प्रवाशांच्या तुलनेत या बसेस अपुऱ्या पडत असल्याने या जुन्या बसेस मार्गावर आणण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती प्रशासनाच्या वतीने आरटीओ प्रशासनाला करण्यात आली होती. त्यानुसार आरटीओ प्रशासनाने घातलेल्या अटीनुसार त्याची मुदत येत्या तीन महिन्यांत संपत आहे.

त्यामुळे प्रशासनाने जानेवारी महिन्यापासूनच या बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याला बंधने आली होती. राज्यातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा संपला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले आहे.

स्पेअरपार्टसचीही खरेदी करणार…!
पीएमपीएमएलच्या बसेस स्पेअरपार्टसच्या अभावी बंद राहू नयेत, यासाठी प्रशासनाच्या वतीने दररोज मिळणाऱ्या महसूलातील काही टक्के निधी हा राखीव ठेवला जातो. मात्र, तरीही हा निधी पुरत नाही. त्यामुळे आजही अनेक बसेस स्पेअरपार्टसच्या अभावी उभ्या ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होत असून प्रशासनाचा महसूलही बुडत आहे. त्याची गंभीर दखल घेत स्पेअरपार्टस खरेदीला आगामी काळात प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.