पुणे – सुट्टीचा दिवस, त्यात पावसामुळे डोंगरमाथा हिरवाईने नटलेला, फेसाळणारे धबधबे या निसर्गरम्य पर्यटनासह देवदर्शानाचे नियोजन करत असाल तर पीएमपीने खास पर्यटन बससेवा सुरू केली आहे. मागील महिन्यांत या सेवेला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 318 पर्यटक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पर्यटन व देवदर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता पीएमपीकडून विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे. 1 मे 2023 पासून ही सेवा सुरू करण्यात आली असून, मागील वर्षभरात 1 हजार 367 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.
त्यातून पीएमपीला ६ लाख ८३ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. वर्षभरात मार्च आणि एप्रिल महिना परिक्षांचे दिवस असतात. तर, अन्य दिवसांत प्रवासा प्रतिसाद कमी-अधिक असला तरी पावसाळ्यात हा प्रतिसाद उत्स्फुर्त असतो. त्यामुळे जुन, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पीएमपीला पर्यटक प्रवासी संख्या आणि उत्पन्न अधिक मिळते.
पावसाळी पर्यटनासाठी पीएमपीकडून आठवड्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन बससेवा सुरू आहे. त्यासाठी स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी प्रत्येकी 500 रूपये तिकिट दर असून, प्रवाशांना माहिती देण्यासाठी या बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक केलेली असते.
तसेच ज्या दिवशी बुकींग केले त्या दिवशी सदर प्रवास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहचल्यानंतर राहत्या घरापर्यंत बुकिंग केलेल्या तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करता येऊ शकतो. दरम्यान, अल्प प्रतिसाद मिळाला किंवा अपरिहार्य कारणास्तव संबंधित बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी) प्रवास करू शकतील.
पर्यटन बससेवेचे मार्ग…
मार्ग क्र. १ : हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर
मार्ग क्र. २ : हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर
मार्ग क्र. ३ : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन
मार्ग क्र. ४ : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन
मार्ग क्र. ५ : पुणे स्टेशन, पूलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन
मार्ग क्र. ६ : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर, वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधीमंदिर, रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन
मार्ग क्र. ७ : भक्ती-शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी, देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी
येथे करा बुकिंग…
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवर. बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत मिळणार. तसेच सिंहगड रोडवरील कृष्णाई वॉटर पार्क आणि लोणावळा रोडवरील वेट अॅण्ड जॉय पार्क येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस बुक करता येऊ शकते.