पुणे : शिवसेनेतील फूटीनंतर विधानसभा निवडणूकीत पुण्यात महायुतीत असलेल्या शिवसेनेने एकही जागा लढविली नसली तरी मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या यशात शिवसेनेचा मोठा वाटा होता. त्यामुळे, शहर शिवसेनेला बळकटी मिळाली असून हडपसरसह पुर्व भागात वाढत असलेली पक्ष संघटना अगामी महापालिका निवडणूकीत मोठया यशाच्या तयारीत आहे. मात्र, त्याच वेळी राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याला राज्यात आणखी प्रतिनिधीत्व मिळाल्यास पक्षाला महापालिका निवडणूकीत आणखी ताकद मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांना मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
भाजप-शिवसेना युतीत असताना २००९ च्या विधानसभा निवडणूकीत हडपसर आणि कोथरूड या दोन ठिकाणी पक्षाचे आमदार होते. २०१४ ला युती तुटली आणि त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. दोन्ही जागा सेनेला गमवाव्या लागल्या. पुढे२०१७ च्या महापालिका निवडणूकीत सेनेचे केवळ १० नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २०२२ ला शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात पक्ष आला. मुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळाले, त्यामुळे पुण्यातील सेनेला ताकद मिळून पक्ष वाढ होईल अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. शहर प्रमुख नाना भानगिरे यांचा अपवाद वगळता एकही नगरसेवक शिंदे समवेत आले नाहीत.
उर्वरीत नगरसेवकांनी मात्र सावध पवित्रा घेत ठाकरे यांच्या समवेतच थांबण्याचा निर्णय घेतला. परिणामी भानगिरे यांनी एकला चलो करीत पुण्यात शिवसेना वाढविण्याचे काम केले. विधानसभेला सर्वच मतदारसंघात शिवसेनेने भाजपला मदत केल्याचे अधोरेखीत झाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या शिवसेनेने आता पालिका निवडणूकीची तयारी सुरू केली असून शहरात अनुकूल असलेल्या जागांची चाचपणी केली जात आहे.
मात्र आगामी काळात महापालिकेत शिवसेनेची ताकद आणखी वाढायची झाल्यास पक्षाकडून शहरात राज्य पातळीवर प्रतिनिधीत्व देण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी पुण्याला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता पुन्हा विधानसभा निवडणूकांमध्ये पुण्यात महायुतीचा धर्म पाळणाऱ्या शिवसेना पुण्याला प्रतिनिधीत्व मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.