पुणे : कलावंतांसाठी शहरातील प्रमुख व्यासपीठ असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे व्यासपीठ (स्टेज) आता गारेगार राहणार आहे. महापालिकेने येथे साडेचार टन क्षमता असलेले चार नवीन एसी (वातानुकूलन यंत्रणा) बसवली आहे.
व्यासपीठावर नाटक अथवा इतर कार्यक्रमावेळी प्रकाश यंत्रणेमुळे कलावंतांना उकाडा सहन करावा लागतो. त्यामुळे व्यासपीठासाठी “एसी’ बसविण्याची मागणी केली जात होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने अवघ्या सात दिवसांत ही यंत्रणा बसविली आहे. त्यानंतर नाट्यगृह सोमवारी रात्रीपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात महापालिकेने प्रेक्षकांसाठी वातानुकूलन यंत्रणा मागील वर्षी बसवली. पण, सभागृहात “सेंट्रल एसी’ असले, तरी त्याची हवा पाहिजे तेवढ्या प्रमाणात स्टेजवर येत नव्हती. त्यामुळे कलाकारांना उकाडा सहन करावा लागायचा. त्यावर महापालिका प्रशासनाने दि. ६ ते १२ जानेवारीपर्यंत नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
नाट्यगृहात स्टेजवरील प्रकाश व्यवस्थेमुळे उकाडा सहन करावा लागत असल्याच्या कलाकारांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ३५ लाख रूपये खर्चून नवीन चार एसी बसविण्यात आले आहेत. सहा दिवसांत हे काम पूर्ण केले आहे. एखाद्या रुग्णालयातील “आयसीयू’ मध्ये असणाऱ्या यंत्रणेप्रमाणे हे एसी असून त्यांचे केवळ फिल्टर स्वच्छ करावे लागतात. त्यामुळे त्याचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी आहे.
– मनीषा शेकटकर, विद्युत विभागप्रमुख, मनपा
तसेच या सहा दिवसांत ही यंत्रणा युद्धपातळीवर उभारण्याचे काम करत सोमवारी ( दि. १३) रोजी सकाळी या यंत्रणेचे काम पूर्ण करत रात्री पहिला नाटकाचा प्रयोगही झाला आहे. त्यामुळे कलाकारांकडून महापालिकेचे आभार मानण्यात येत आहेत.