विश्रांतवाडी – वडगावशेरील विकास करणारा आमदार हवा की विनाश करणारा आमदार हवा, हे तुम्ही राज्याला दाखवून दिले पाहिजे. बापूसाहेब पठारे हे एक कर्तबगार उमेदवार आहेत. त्यांनी मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या रुपाने वडगावशेरीत विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा दमदार उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे तर वडगावशेरीला बदनाम करणाऱ्या आमदारांना घरी बसवा, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
धानोरीतील परांडेनगर येथे वडगावशेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी जनकल्याण जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी बापूसाहेब पठारे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, माजी नगरसेविका रेखा टिंगरे, पक्षाचे प्रवक्ते सुनील माने, माजी नगरसेवक सागर माळकर, सचिन भगत, सुनील गोगले, महादेव पठारे, सुनील मलके, संजय भोसले, ऍड. सतीश मुळीक, सुनिल खांदवे, चंद्रकांत टिंगरे, संतोष भरणे, स्वाती पोकळे, कैलास पठारे, यशवंत गोसावी, संभाजी परांडे, राजू ठोंबरे, सचिन भोसले तसेच यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. पठारे यांना अंबुज पार्टी, डेमोक्रॅटीक रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठींबा दिला.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील त्रिकुट सरकारने राज्याचे अतोनात नुकसान केल्याने त्यांना शिक्षा करा, गद्दारांना शिक्षा करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडणाऱ्यांना शिक्षा द्या, विचारांची लढाई जिंका, असे आवाहन केले. राज्यातील सध्याचे सरकार चुकीच्या मार्गाने सत्तेवर आले असून चुकीच्या कामाने चालत राहिले. त्यामुळे राज्य २० वर्ष मागे पडले आहे. हे सरकार केवळ घोषणाबाजी करते. मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. विकास फक्त कागदावर आहे, पण त्याचा लाभ सामान्य लोकांना मिळालेला नाही. समाजा-समाजात आणि धर्मा-धर्मात लढाया लावून भाजप सरकार स्वतःच्या भाकऱ्या भाजत असून त्यांचा सुपडा साफ केला पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
वडगावशेरीला मॉडर्न विकासाचे मॉडेल करू : पठारे
आपण काय करतोय याचे भान नसणारे विरोधी पक्षाचे आहेत. त्यांनी हा मतदारसंघ राज्यात बदनाम केला. मी निवडून आल्यावर वडगावशेरीची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करेन. मॉडर्न विकासाचे मॉडेल म्हणून मतदारसंघाला नावलौकिक मिळवून देईल. पाण्यासाठी आंदोलन करून, लॉकअपमध्ये जाऊन, वास मारणारी भाकरी खाणारा, मी कार्यकर्ता आहे, कमी पडणार नाही. वडगावशेरीच्या जनतेने मला नेहमीच विश्वास दिला आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझा एकमेव उद्देश हा वडगावशेरीचा विकास साधणे आहे, आणि त्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन,असे बापूसाहेब पठारे म्हणाले.