पुणे- राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विविध कार्यालयांतील 52 अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नत्या देण्याचा धडाका लावला आहे. यातील बहुसंख्य अधिकाऱ्यांना पदोन्नत्यांच्या माध्यमातून सोयीच्या ठिकाणच्या नियुक्त्या मिळाल्या असल्याने लॉटरीच लागली आहे. दरम्यान, यातुन अखेर पुणे व पिंपरी-चिंचवडला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट “ब’ (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवडसूचीनुसार शिक्षणाधिकारी व तत्सम महाराष्ट्र शिक्षण सेवा गट “अ'(प्रशासन शाखा) या पदावर सुधारित वेतन संरसचनेत ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसारस रिक्त पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी संध्या गायकवाड यांची, तर पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षणाच्या शिक्षणाधिकारी पदी संजय नायकडे, पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या रिक्त जागी पोपट काळे यांची वर्णी लावली आहे. दरम्यान, संगिता घोडेकर यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत सहायक आयुक्त पदावर संधी दिली आहे. मोहन गायकवाड यांची सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ज्योती परिहार यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या बृन्मुंबई येथील विभागीय सहसचिव या पदावर संधी देण्यात आली. संगिता शिंदे यांना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
प्रसाद कालगावकर यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयात सहायक शिक्षण संचालकपदी तर माणिक बांगर यांची पुणे बोर्डाच्या सहसचिवपदी नियुक्ती झाली आहे. भाऊसाहेब कारेकर यांना ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहायक संचालक पदी नामदेव माळी, पोपटराव माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.