पुणे(प्रतिनिधी) – महायुतीतील सर्वांची वज्रमूठ करत जोमाने काम करत आहे. त्यामुळे लोककल्याणकारी महायुतीचे सरकार आणण्यासाठी जनता कसबा मतदारसंघातील (Kasba Assembly Election 2024) मतदार महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवतील, असा विश्वास महायुतीच्या विजयसंकल्प मेळाव्यात करण्यात आला.
यावेळी भाजप माजी राष्ट्रीय महामंत्री सी. टी. रवीजी, रिपाइं (आठवले गट) अध्यक्ष संजय सोनावणे, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना प्रदेश सचिव किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक, रिपाइंचे मंदार जोशी, गौरव बापट, गणेश बीडकर, शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हेमंत रासने हे अत्यंत शांत आणि संयमी असून, त्यांनी गेल्या १८ महिन्यांमध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. पराभव झाल्यानंतर अनेक जण खचून जातात. मात्र, त्यांनी दुप्पट गतीने नागरिकांची सेवा केली. त्यामुळे कसब्यातील जनता त्यांना नक्की आशीर्वाद देईल, असा विश्वास आहे.”
– दीपक मानकर (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
या वेळी धीरज घाटे म्हणाले, कसबा मतदारसंघात एकवटलेली महायुतीची ताकद बघितल्यानंतर आपले उमेदवार रासने विजयी होणार हे निश्चित झाले आहे. लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा अधिकचा लीड मिळेल.