सिंहगडरस्ता – धायरी गावातील डी.पी. रस्ते तत्काळ करावेत, या मागणीसाठी रविवारी आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ता धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली उंबऱ्या गणपती चौक येथे जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आमदार, खासदार, डीपी रस्त्याचा प्रश्न भिजत ठेवणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला.
यावेळी सुनिता काळे, किशोर मुजुमदार, किरण कद्रे, राजाभाऊ बेनकर, ईश्वर बेनकर, संदीप बेनकर, अर्चना बेनकर, अनिता बेनकर, रुपाली बेनकर, बाबुराव पोकळे, शंकर पोटगळ, मनीषा शिंदे, अमीत मस्के आदी उपस्थित होते. धायरी येथील 1) सावित्री मंगल कार्यालय ते वडगाव डीपी रोड 2) बेनकरनगर सर्व्हे. नं. 6 व 7 आणि 8 मधून ओढ्याला लागून जाणारा 60 फुटी प्रस्तावित रोड 3) काका चव्हाण बंगला ते ड्रॅन कंपनी सर्व्हे नं. 30 मधून जाणारा ते श्री कंट्रोल चौक प्रस्तावीत रोड 4) हायब्लिस सोसायटी ते लक्ष्मी लॉज नऱ्हेगाव डीपी रोड हे चार डीपी रस्ते गेल्या 25 वर्षांपासून फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे या रस्त्यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे.
वरील चार रस्ते होईपर्यंत दळवीवाडी फाटा ते डी.एस.के. विश्व ते उंबऱ्या गणपती चौक ते पारी कंपनी चौक ते श्री कंट्रोल चौक ते वेताळ बाबा चौक भूमकर ब्रीज ते गाय मुख ते दत्त नगर चौक पूर्णपणे शंभर फुट रुंदीचा रस्ता तातडीने अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी किशोर मुजुमदार यांनीही मागण्या मांडल्या.
पुणे महानगरपालिकेने दळणवळणासाठी महत्वाच्या असणाऱ्या डीपी रस्त्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. गेल्या 25 वर्षांपासून हे डीपी रस्ते का विकसित होऊ शकले नाहीत? धायरीत झपाट्याने लोकवस्ती वाढत आहेत. परंतु त्या मानाने हक्काचे रस्ते असून नसल्यासारखे झाले आहे. रस्ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे.
– धनंजय रामचंद्र बेनकर, प्रवक्ता, आप