पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह जलजन्य (दुषीत पाण्यापासून) आजार वाढण्याचा धोका अधिक आहे. प्रामुख्याने मागील काही दिवसांत शहरामध्ये टायफाॅइडच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे,
त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषत: लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्यावेत आणि लसीकरणही करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात.
तसेच, नकळत दूषित पाणी पिल्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यासारखे आजार होतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आरोग्य विभागाकडूनही जनजागृतीसह पुणेकरांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
तत्काळ उपचार घ्यावेत…
पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे. तर विषाणूजन्य आजारात मलेरिया, हिवताप, स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, कॉलरा हे आजार बळवतात. तसेच सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, अम्प्लपित्त यासारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात.
योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते. त्यामुळे लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सर्दी, ताप, खोकला, घसा अशी लक्षणे दिसून आल्यास तत्काळ आशा, नर्स, आरोग्य सेवकाकडून उपचार करून घ्यावे. तसेच पुणे महापालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा. कोणताचाही आजार अंगावर काढू नये. – डाॅ. सुर्यकांत देवकर – सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे मनपा