पुणे -भारत तसेच जगभरातील 50 हून अधिक “ब्रॅंड’ने तयार केलेले उच्च प्रतीचे आणि विविध प्रकारातील दोन हजारांहून अधिक पेनांचे प्रदर्शन, उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठीचे खास पेनकेस, त्याचबरोबर ऐतिहासिक महत्व असणारे विविध लेखन साहित्य अशा विविध गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची संधी सहाव्या “आंतराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टीव्हल’ नागरिकांना मिळणार आहे.
“रायटिंग वंडर्स’तर्फे दि.10 – 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या या फेस्टिव्हलचे उद्घाटन 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमेरिकेतील “शेफर पेन’चे प्रमुख निखील रंजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते “माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’ प्रदर्शित केला जाणार आहे. या “फेस्टिव्हल’मध्ये पटना येथील पेन संग्राहक युसुफ मन्सूर, पेनचे चाहते आणि वास्तुविशारद यशवंत पिटकर, “विंटेज पेन’चे संग्राहक जितेंद्र जैन हे यावेळी नागरिकांशी संवाद साधतील. बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून विविध प्रकारे स्वाक्षरी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील. मुंबई येथील आनंद हे पेन दुरुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करत त्याबाबत मार्गदर्शन करतील. सिंबायोसिस महाविद्यालयाच्या डिझाइन विभागाचे प्रमुख मनोहर देसाई यांनी संकलित केलेल्या दुर्मीळ ऐतिहासिक लेखन साहित्यांचे प्रदर्शनही येथे पहायला मिळणार आहे.
पेनच्या चाहत्यांना उच्च प्रतीचे पेन पाहता यावेत, यासाठी गेली सहा वर्षे आम्ही या “फेस्टिव्हल’चे आयोजन करत आहोत. यंदा लॅमी, पायलट, ऑरोरा, अरिस्ता, क्रॉस, बीना, कोंक्लीन, डिप्लोमॅट, क्लिक, पार्कर, पु.ल. देशपांडे सिग्नेचर पेन, खास लहान मुलांसाठी “चिंटू’ पेन अशा विविध ब्रॅंड’चे फाउंटन पेन त्याचबरोबर रोलर पेन, मॅकेनाइज्ड पेन्सिल्स पहायला मिळणार आहेत.
– सुरेंद्र करमचंदानी, संयोजक, पेन फेस्टिव्हल
फेस्टिव्हलची माहिती
स्थळ : हॉटेल जें. डब्ल्यू मेरीएट, सेनापती बापट रस्ता
वेळ : सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत
प्रवेश : विनामूल्य