लोणी काळभोर -आगामी काळात लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुणे पॅटर्न राबवणार आहे. यामधून गुन्हेगारांना मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे प्रतिपादन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
लोणी काळभोर व लोणीकंद ही ग्रामीण भागातील पोलीस ठाणी शहर पोलीस आयुक्तालयास जोडण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याची पाहणी करण्यासाठी गुप्ता आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त रविंद्र शिसवे, पूर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडल 5 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व दगडू हाके उपस्थित होते.
संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार शहरात पुणे पोलीसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. बहुतांश टोळ्यांवर प्रभावीपणे मोक्का लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. तशीच कारवाई ग्रामीण भागातील गुन्हेगारांवरही करण्यात येणार आहे.
बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी व सावकारांना पायबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश कायदा आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद केलेली आहे. आगामी काळामध्ये ग्रामीण भागात बेकायदा खासगी सावकारकी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
यांचबरोबर दारू, मटका, जुगार तसेच वाळूमाफियां समवेत इतर अवैध धंदे करणारांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, पुणे-सोलापूर व पुणे-नगर या दोन्ही महामार्गावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येसाठी कायदा, सुव्यवस्था सांभाळणे यांस आम्ही प्राधान्य देणार आहोत. गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.
पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात, जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याअनुषंगाने गुन्हे व इतर प्रशाकीय माहिती घेऊन लवकरात लवकर या दोन्ही पोलीस ठाण्याचे हद्दीत कशाप्रकारे प्रभावीपणे काम करता येईल, त्यामुळे गस्त वाढवून गरजेच्या वेळी तत्काळ मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.