वाढते संक्रमण रोखण्यात सर्वेक्षणामुळे यश; आतापर्यंत पाचवेळा सर्वेक्षण
पुणे – शहरातील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मे अखेरपर्यंत पुण्यात करोना बाधितांचा आकडा 10 हजारांच्या घरात जाईल, असा अंदाज पालिका प्रशासनाने बांधला होता. तसेच, त्या अनुषंगाने तात्पुरती हॉस्पिटल तसेच उपचाराची सुविधा देण्याची यंत्रणाही पालिकेने उभारली आहे. मात्र, पालिकेचा हा अंदाज प्रशासनाकडून राबवलेल्या घरोघरी सर्वेक्षणाच्या पुणे पॅटर्नमुळे फोल ठरला आहे.
महापालिकेने गेल्या दोन महिन्यांत तब्बल 5 वेळा करोना संशयितांच्या तपासणीसाठी शहर पिंजून काढले. त्यात, तब्बल 1 कोटी 12 लाख 22 हजार 312 जणांची तपासणी केली. त्यात 33 लाख 18 हजार 942 घरांची तपासणी करण्यात आली. यासाठी सुमारे प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांची 900 ते 1 हजार पथके अविरतपणे कार्यरत आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांकडून संक्रमण होण्याआधीच ते सापडत असल्याने करोनाचा गुणाकार रोखण्यात महापालिकेस यश आले आहे.
शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने सुरुवातीला करोनाबाधित रुग्णाच्या घराच्या तीन किलोमीटरच्या परिसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागील दोन महिन्यांत शहरात तब्बल 5 वेळा पूर्ण शहराचे सर्वेक्षण झाले.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, महापालिकेतील 11 गावे वगळता शहराची लोकसंख्या 33 लाख आहे. या लोकसंख्येची पाचवेळा तपासणी केली आहे. त्यात, थर्मोमीटर तसेच ऑक्सिमीटरद्वारे आणि रुग्णांना करोनाची लक्षणे आहेत का याची माहिती घेऊन हे सर्वेक्षण केले जाते. यात आढळलेल्या संशयितांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. त्यामुळे संक्रमण रोखण्यास मदत झाल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
अशी तोडली जातेय संक्रमण साखळी
महापालिका प्रशासनाकडून केवळ सर्वेक्षण करूनच थांबले जात नाही. या सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तींसोबत रुग्णवाहिकेची सोयही दिली जाते. याशिवाय ज्या भागात संशयित आढळतात त्या भागातून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये घेऊन जातात. त्यानंतर त्यांचे करोना तपासणीचे नमुने घेऊन त्यांना अहवाल येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तर तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णास तातडीने उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. या रुग्णांपासून पुढे होऊ शकणारे संक्रमण तातडीने रोखणे शक्य होत आहे.