पुणे – पुण्यातील पथारीवाले, हातगाडीवाले आणि स्टॉलधारक यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यासंदर्भात आपण निश्चितपणे महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवू आणि त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन महाविकास आघाडीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पथारी व्यावसायिकांना दिले. तसेच तुमच्या संदर्भातील धोरणांची सक्षमपणे अंमलबजावणीचेही प्रयत्न निश्चितपणे करू, अशी ग्वाहीही दिली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ धंगेकर यांनी लक्ष्मी रस्ता व परिसरातील हातगाडी, फेरीपथारी, स्ट़ॉलधारक यांची भेट घेतली. यावेळी जाणीव संघटना प्रणीत हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
तसेच धंगेकर यांनी पथविक्रेता योजना-२०२४ अमलात आणावी, पथविक्रेता, धोरण, पथविक्रेता कायदा आणि पथविक्रेता योजना निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या संघटनेने केली असून, हे काम धंगेकर निश्चितपणे करतील, असा विश्वास व्यक्त केला. संघटनेने घेतला आहे. संघटनेतर्फे अध्यक्ष श्वेता ओतारी, उपाध्यक्ष कैलास बोरणे, विभागीय अध्यक्ष विनायक दहीभाते, विभागप्रमुख अभिजित हत्ते, विभागप्रमुख संदीप यादव, विभागप्रमुख परवेज अन्सारी यांच्या स्वाक्षरीने हे पाठिंब्याचे पत्रक धंगेकर यांना देण्यात आले.
दरम्यान, खडकमाळ परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, हेमंत येवलेकर, रमेश साठे, निलेश बोराटे, पंकज बरीदे आदी सहभागी झाले होते.