पुणे – राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवारी यादी शनिवारी जाहीर झाली. यात पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, बहुचर्चित खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीत काॅंग्रेस पक्षाकडून पर्वती विधानसभा मतदारसंघाची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅंग्रेसकडेच राहिला आहे. तर दोडके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार भिमराव तापकीर यांना शेवटच्या फेरीपर्यंत विजयासाठी झुंजविले होते.
दोडके यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव झाला होता. तर, पक्ष फुटीनंतर दोडके हे राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षातच राहिले होते. पर्वती मतदारसंघात कदम यांचा भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ पराभव केला होता. मात्र, त्यानंतरही कदम या मागील पाच वर्षांपासून तयारी करत होत्या.
पुण्यात राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’
महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे शहरातील आठ मतदारसंघांत राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाला चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथून शरदचंद्र पवार यांचा पक्षच “मोठा भाऊ’ ठरला आहे. तर, काॅंग्रेसच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर, शिवसेना-उद्धव ठाकरे पक्ष मात्र पुण्यात कोथरूडची एकच जागा लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर, राष्ट्रवादीने आपले पुण्यातील चारही उमेदवार जाहीर केले आहेत. काॅंग्रेसने केवळ एकच उमेदवार जाहीर केला आहे. तर, शिवसेनेच्या दोन्ही याद्यांमधून कोथरूडचा उमेदवार जाहीर झालेला नाही. तर, भाजपमधील नाराज असलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा असल्याने ही उमेदवारी जाहीर केली जात नसल्याचे बोलले जात आहे.
आबा बागुल यांच्या भूमिकेकडे लक्ष
काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांच्याकडून पर्वती विधानसभा मतदारसंघात तयारी करण्यात आली होती. तसेच २०१४ पर्यंत जागावाटपात काॅंग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाला मिळेल, अशी खात्री असलेल्या बागूल यांनी दोन दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
तसेच उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसकडूनही लढण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र, अखेर कदम यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले. त्यामुळे बागुल यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळीही बागुल यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, संधी न मिळाल्याने बागुल यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.