पुणे – शाळांच्या मनमानीविरुद्ध पालकांचा संताप

शुल्क वाढप्रकरणी आज तीव्र आंदोलन

पुणे – वाढीव फी वसुली करुन मनमानी कारभार करण्याऱ्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला शासनाच्या शिक्षण विभागाने आळा घालावा, या मागणीसाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक एकजूटीने शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारी तीव्र आंदोलन करणार आहेत.

गेल्या काही दिवसात कोंढव्यातील विबग्योर, हडपसरमधील ऍमनोरा, कोथरुडमधील एमआयटी या विविध शाळांनी विद्यार्थ्यांकडून वाढीव फी वसूल करण्याचा तगादा लावला आहे. वाढीव फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणे, परीक्षेला बसू न देणे, शाळेतून काढल्याचे दाखले पोस्टाने पाठविणे आदी प्रकार शाळांकडून केले जात आहेत. पालकांनी या फी वाढीला अनेक मार्गांनी विरोध दर्शविलेला आहे. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही बऱ्याचदा पालकांनी घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शाळांना लेखी आदेशही बजाविले. मात्र शाळांकडून हे आदेश धुडकावून लावण्यात आले.

काही शाळांच्या विरुद्ध पालकांनी न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, यावर न्यायालयात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पालकांच्या दृष्टीने सकारात्मक बाजू मांडण्याचा कधीच प्राधान्य देण्यात आले नाही. यामुळे पालकांच्या संतापात आणखी वाढ झाली आहे.

दोषी शाळांवर कारवाई होणे आवश्‍यक आहे. वाढीव फी भरली नाही म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, शाळांनी चुकीचा व अन्यायकारक कारभार थांबवावा या मागण्यांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवडच्या शाळांमधील पालकांनी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता पालक आंदोलन करणार आहेत. वारंवार दिलेल्या मागण्यांच्या पत्रावर अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला आहे, याबाबतची विचारणा पालकांकडून अधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.