पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा मोठया प्रमाणात मुठा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे एकता नगरी भागातील तीन सोसायट्यांच्या काही भागांत शनिवारी पुन्हा पाणी शिरले.
द्वारका, श्यामसुंदर आणि जलपूजन या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. दरम्यान, या भागात पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमनदलाचे पथक या भागात चोवीस तास तैनात ठेवण्यात आले आहे. नदी पात्रात विसर्ग वाढल्यास या भागातील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील आठवड्यात दि. २५ जुलैला मुठा नदीत अचानक ३५ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी भागातील सुमारे ५० पेक्षा अधिक सोसायट्यांमध्ये तसेच २०० पेक्षा अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते, त्यानंतर अद्यापही या धरणसाखळी मधील चारही धरणांत पाऊस सुरू असल्याने पुन्हा पूरस्थिती ओढावू नये, यासाठी धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मात्र, शुक्रवारी रात्रीपासून खडकावसला धरणसाखळी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी रात्री ११:०० वाजता खडकवासला धरणातील पाण्याच विसर्ग रात्री ११:०० वाजता १८ हजार करण्यात आला होता. तो पहाटे पाच वाजता २१ हजार क्यूसेक करण्यात आला. तर सकाळी ८:०० वाजता तो वाढवून २३ हजार क्यूसेक करण्यात आला.
मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने दुपारी १२:०० वाजता हा विसर्ग २७ हजार करण्यात आला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास या सोसायट्यांच्या मागील बाजूने पाणी आल्याने द्वारका सोसायटीचे पार्किंग पाण्यात गेले होते.
अग्निशमनदल तैनात…
शुक्रवारी मध्यरात्री पासूनच खडकसवाला धरण साखळी परिसरात जोरदार पाऊस असल्याने मोठया प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागणार होते. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि अग्निशमनदलाचे स्वतंत्र पथक या भागात तैनात करण्यात आले आहे. पथकाकडे बोटीसह, इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांंना बाहेर काढल्यास त्यांच्यासाठीची इतर सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.