पुणे-पंढरपूर पालखी मार्ग खडतर

नीरा ते जेजुरी खिंड या 20 किलोमीटरमध्ये मोठमोठे खड्डे ः अपघाताला आमंत्रण

वाल्हे-पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते जेजुरी खिंड या 20 किलोमीटरच्या रस्त्यावरील जेजुरी खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामधून काही वेळा अपघात घडले आहेत. दरम्यान या पालखी महामार्गाची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.

मागील काही वर्षांत शासनाने दिवे घाट ते जेजुरी औद्योगिक वसाहत या पालखी महामार्गावरील चौपदरीकरण सुरू केले होते; मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नाही. तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या पुढील रस्ता जेजुरी खिंड ते नीरा या रस्ताचे रुंदीकरण अद्यापपर्यंत केले गेले नाही. काही ठिकाणी तर दोन गाड्या रस्त्यावरही बसत नसल्याने या रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने पोलिसांच्या मदतीने हलवण्यात आली होती; परंतु अद्यापपर्यंत पुढील काहीच हालचाल झालेली नाही.

या महामार्गावरून सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगलोर आदी अनेक मोठ्या रस्त्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने अनेक अवजड वाहने या मार्गावरुन ये जा करत असतात. तसेच या मार्गाने अनेक तीर्थक्षेञांना जाता येते. यामध्ये, जेजुरी, मोरगाव, आळंदी, देहू, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आदी मोठ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. तसेच जेजुरी, नीरा, लोणंद या ठिकाणावरील औद्योगिक वसाहतीमध्ये दररोज अनेक महिला तसेच पुरुष कामगार याच रस्त्याने जात असतात. या महामार्गावरील सध्याची वाहतूक परिस्थिती पाहिली तर या मार्गावरील पडलेले खड्डे तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्टा त्वरित भरून घेणे आवश्‍यक आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या मार्गावरुन दरवर्षी जात असल्याने, याही वर्षी नेहमी प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्टी भरून घेण्यात आली होती; मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस जास्त झाला असल्याने साइडपट्टी वाहून गेली आहे. त्यामुळे आत्ता या मार्गावरून प्रवास करताना दोन मोठी वाहने बसत नसल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या रस्त्याच्या मध्यभागी तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले असून रस्त्याला आकारच राहिला नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे.

  • राज्य सरकारने तरी लक्ष द्यावे
    हा रस्ता पालखी महामार्ग म्हणून जरी केंद्र सरकारकडे हस्तांतरीत केला असला तरी, राज्य सरकार प्रशासनाने याकडे गांभीर्याने विचार करून या मार्गावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर या महामार्गावरील खड्डे तसेच साइडपट्टी भरावी; अन्यथा पुरंदर तालुका समता परिषद रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे पुरंदर तालुका समता परिषदेचे कार्याध्यक्ष संतोष भुजबळ व महात्मा फुले विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शंकर भुजबळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.