पुणे : ब्रह्मोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सवमूर्तींची पालखी मिरवणूक थाटात काढण्यात आली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या मूर्तींची मंदिराच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हा अनोखा कार्यक्रम देखील मंदिरात पार पडला.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, नारायण काबरा, तृप्ती अग्रवाल, रमेश पाटोदिया, नीलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदी उपस्थित होते.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरू रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा झाला. या वेळी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
उत्सवमूर्तींची धान्यतुला करून ते धान्य मुळशी तालुक्यातील किरवली, सावरगाव अशा आदिवासी भागांत देण्यात आले. याशिवाय पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी – विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्तीही देण्यात आली.