कोंढवा – ठिकठिकाणी झालेले जोरदार स्वागत…माता-भगिनींनी केलेले औक्षण…ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद…अपक्ष उमेदवार गंगाधर (आण्णा) बधे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करीत उत्स्फूर्त प्रतिसादात बधे यांची पदयात्रा व बाईक रॅली कात्रज-कोंढवा परिसरात आज पार पडली.
ग्रामदैवताचा आशिर्वाद घेवून, निष्ठावंत शिवसैनिक व माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या काञज-कोंढवा येथील प्रचार पदयाञा व बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. माता-भगिनींनी पाठींबा देत अपक्ष उमेदवार बधे यांचे औक्षण करुन विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रचार पदयात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक व शेकडो युवक बाईक रॅलीत सहभागी झाले होते.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गंगाधर (आण्णा ) बधे यांची पदयात्रा व बाईक रॅली आज सकाळी कोंढवा येथील भाजीमंडई येथून सुरू झाली, त्यानंतर संतोषनगर परिसर, अंजनीनगर, जैन मंदिर, कात्रज गावठाण, कात्रज भैरवनाथ मंदिर, वरखडेनगर, शेलारमळा, महादेव नगर, अरुणोदय सोसायटी परिसर, बलकवडे नगर, शिवशंभुनगर, विद्यानगर, गोकुळ नगर, साई नगर, क्रांती चौक, सुखसागर नगर, अंबामाता चौक आदी भागातून निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी एअर कंडीशनर हे चिन्ह समजावून सांगत मतदान करण्याचे आवाहन बधे यांनी केले.
गंगाधर(आण्णा) बधे म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदारसंघात विविध नागरी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडी, कचरा, पाणी आदी समस्यांनी येथील जनता हैराण झाली आहे, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून, तुम्हा सर्वांची साथ मिळाली तर मतदार संघाचे नंदनवन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी व्यक्त केला.