पुणे – शहरात गेल्या चार वर्षांत एड्सबाधितांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त असून, सध्या 5 हजार 438 झाली आहे. त्यांच्यावर “एआरटी’मध्ये उपचार सुरू आहेत. यात पालिका रुग्णालयात गेल्या वर्षभरात 894 तर खासगी रुग्णालयात 39 जणांची नोंद झाली आहे, असे एकूण 933 रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत.
एचआयव्ही किंवा एड्सबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक “एड्स दिन’ म्हणून पाळला जातो. या रोगावर अद्याप औषध उपलब्ध नाही, परंतु योग्य औषधोपचाराने बाधित व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकतो. महापालिका हद्दीत असलेल्या एड्स बाधितांचे आणि संशयितांचे समुपदेशन करण्यात येते. सरकारी रुग्णालयात त्यांची मोफत रक्त तपासणी करण्यात येते.
एखाद्या संशयिताचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची रोग प्रतिकारकशक्ती किती आहे हे तपासून “सीडी-4 काऊंट’ पाहिला जातो. त्याच्या शरीरातील एड्स विषाणूंचे (व्हायरल लोड) प्रमाण किती आहे याचीही तपासणी केली जातो आणि त्यानंतरच त्याची औषधोपचाराची दिशा ठरवली जाते. याशिवाय बाधिताची क्षयरोग, रक्तदाब, मधुमेह तपासणी केली जाते आणि त्यानुसार महापालिकेच्या गाडीखाना येथे त्याच्यावर मोफत उपचार केले जातात. शहरात 2014ला “एड्स उपचार’ केंद्र सुरू करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत येथे 5 हजारांहून अधिक रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी सध्या 3 हजार 300 रुग्ण नियमित औषधे आणि उपचार घेण्यासाठी शहरातील 14 केंद्रांवर जातात. तर काही रुग्ण इतर जिल्ह्यांत, अन्य राज्यांत स्थलांतरित झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती येरवडा येथील “एआरटी’ केंद्राचे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. बाबासाहेब सोरटे यांनी दिली.
चार वर्षांत 94 मृत्यू
गेल्या चार वर्षांत (2018 ते 2021) शहरात एड्सच्या 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक शहरात राहत असलेल्या आणि नियमित उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद असते. मात्र बऱ्याचदा पॉझिटिव्ह असलेले रुग्ण स्थलांतरित होतात. या व्यक्ती तेथे उपचार घेतात की नाही किंवा तेथे मृत्यू झाला असेल तर त्याची नोंद होत नाही. त्यामुळे नेमकी, अचूक आकडेवारी समजून येत नाही.
ज्यांना एचआयव्हीची शंका आहे, त्यांनी आपली तपासणी सरकारी रुग्णालयांतील केंद्रावर करून घ्यावी. एचआयव्ही झाल्यावर आयुष्य संपले, असे होत नाही तर नियमित उपचारानंतर ते सामान्य जीवनही जगू शकतात.
– डॉ. बाबासाहेब सोरटे,
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, येरवडा
शहरात एचआयव्हीबाधित रुग्णांना हवा तो सर्व उपचार तसेच पुरेशी औषधेही मिळतात. यावर्षी 56 हजार 849 जणांच्या रक्तचाचण्या केल्या असता, त्यापैकी 894 जणांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर “एआरटी’ केंद्रात उपचार सुरू आहेत.
– डॉ. सूर्यकांत देवकर,
प्रमुख, एड्स प्रतिबंधक विभाग, पुणे मनपा
शहरातील यावर्षीची एचआयव्हीबाधित आकडेवारी (जानेवारी ते ऑक्टोबर 2021)
पुरुषमहिलामुलेमुलीतृतीयपंथीगर्भवतीएकूण
रक्तचाचणी22,85112,38440033921920,65656,849
बाधित49136145627894