पुणे – डेंग्यूचा पुन्हा उद्रेक!

स्वाइन फ्लूदेखील पसरतोय हातपाय


चिकनगुणिया, मलेरियाचाही वाढता प्रादुर्भाव


डासांची पैदास रोखण्यास आरोग्य विभाग अपयशी


थंडीच्या पुनरागमनाने साथीच्या आजारांचे “टेन्शन’


उपचारावेळी प्लेटलेट्‌सचा पुरवठा होतोय अपुरा

पुणे – मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात काही अंशी कमी झाला होता. परंतु, पुन्हा थंडीचा कडाका वाढला आणि स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले. त्यातच डेंग्यूच्या डासांचा “डंख’ कमी करण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याचे दिसून येते. स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यू, चिकनगुणिया आणि मलेरिया रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, तसेच हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य आजार वाढत आहेत.

शहरात जानेवारीत डेंग्यूचे 86 रुग्ण सापडले होते. तर फेब्रुवारीत 20 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वाइन फ्लूपेक्षा डेंग्यू रुग्णांची संख्या अधिक असून चिकुणगुणियाचे 20 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांना उपचारादरम्यान प्लेटलेट्‌सची आवश्‍यकता अधिक असते. परंतू, साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून प्लेटलेट्‌सचा पुरवठा पुरेशा प्रमाण होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.

डासांची पैदास रोखणार कशी?
दरम्यान, डेंग्यूच्या रुणांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात आजही डेंग्यू डासांची पैदास होणारी ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत, हे स्पष्ट असून त्यावर नियंत्रण आणण्यात मात्र आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे यश आले नाही, हेदेखील दिसून येत आहे. औषध फवारणी किंवा डासांची पैदास ठिकाणे नष्ट करणे यासाठी आरोग्य विभागाला वेळच नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

आरोग्य विभाग म्हणतो…
नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात साचलेले डबके स्वच्छ करावे. कोठे डबके आढळून आल्यास तत्काळ स्वच्छ करावे. यामुळे डेंग्यू डासांची पैदास रोखली जाईल, असे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे.

पावसाळा, हिवाळा धोकादायक
मागील वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018पर्यंत) डेंग्यूचे 3 हजार रुग्ण सापडले असून ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे विशेषत: पावसाळ्याचे दिवस आणि हिवाळा पुणेकरांच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

किरकोळ आजारांच्याही तक्रारी
शहरात चार दिवसांपासून बदलेल्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे या साथीच्या आजारासह डोकेदुखी, अंग दुखी, सांधेदुखीसारखे आजार होवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच आजारी असलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्लाही दिला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)