पुणे- ब्रेनडेड युवकाच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याची परवानगी दिल्यामुळे यकृत, मूत्रपिंड, डोळे तसेच स्वादूपिंड दान करण्यात आले. यावेळी सह्याद्री रुग्णालयासह अन्य रुग्णालयातील चार रुग्णांना जीवदान मिळाले. 38 वर्षीय युवक हा मूळचा वर्धा येथील होता. मात्र, तो पुण्यात वास्तव्यास होता.
सह्याद्री रुग्णालयाचे यकृत विभागाचे संचालक डॉ. बिपिन विभूते म्हणाले, “यकृताच्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेल्या वर्धा येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदात्याला चार महिन्यांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण करून घेणाऱ्याला कोणताही धोका होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचे हृदय व फुफ्फूस काढण्यात आले नाही. त्याशिवाय प्राप्तकर्त्याला यापूर्वी क्षयरोग झाला होता. अलिकडेच बुरशीजन्य संसर्ग झाला होता.त्यामुळे त्यांना प्रत्यारोपण आवश्यक होते. युवकाचे डोळे, मूत्रपिंड, यकृत तसेच स्वादूपिंड काढण्यात आले. त्यातील सह्याद्री रुग्णालयातील एका रुग्णावर यकृत तर दुसऱ्या 65 वर्षी महिलेवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले.
तर, युवकाचे दुसरे मूत्रपिंड तसेच स्वादूपिंड अन्य रुग्णालयांतील रुग्णांना पाठवण्यात आले. यकृत प्रत्यारोपण डॉ. विभूते तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये कन्सलंटट मूत्रपिंड डॉ. अनिल गोडबोले, मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. केतन पै, जनरल सर्जन डॉ. संजय कोलते, व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. अद्वैत कोठूरकर यांचा समावेश होता.