पुणे -अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते तसेच ब्रेंडेड व्यक्ती अवयवरूपी जिवंत राहतो. अवयवदानबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. ते दूर व्हावेत, नागरिकांना अवयवदानचे महत्त्व पटावे, यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, असे शैशव चिल्ड्रेन हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र धोंगडे यांनी सांगितले.
शैशव चिल्ड्रेन हॉस्पिटल संचलित संत ज्ञानेश्वर मेडिकल एज्युकेशन स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या वतीने “अवयव दान सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज (दि. 6) लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज येथील रिक्षा स्टॅंड परिसरात नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादरीकरणातून अवयव दानबद्दल जनजागृती केली. यामध्ये अवयव दानबाबत समाजातील गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात आली.
तसेच अवयवदान कधी, कसे करायचे, त्यामुळे होणारे फायदे, कोणते अवयव दान करू शकतो याचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले गेले. यावेळी विविध अवयवांचे पोस्टर गळ्यात अडकवून मुलींनी पथनाट्य सादर केले. यावेळी विद्यार्थीसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. आशिष धोंगडे, मुख्याध्यापिका सय्यद फरीदा खासिम, नर्सिंग को-ऑर्डिनेटर श्वेता नवले-माटले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. यावेळी डॉ. मयुरी धोंगडे यांच्यासह शिक्षिका श्रद्धा पाखरे, शबीना इनामदार, स्मृती कांबळे यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.