पुणे – संत्रीचे भाव सहसा मोसंबीच्या दुप्पट असतात. पण, यंदा चक्क संत्रीचे भाव कमी असल्याचे दिसून येते. राज्यासह परराज्यांतून संत्रीची मोठी आवक होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील किरकोळ बाजारात संत्री ४० ते ५० रुपये, तर, मोसंबी ८० ते १०० रुपये भावाने विक्री होत आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील आडतदार सोनू ढमढेरे यांनी दिली.
जिल्ह्यात शिरुर तालुक्यात अल्प प्रमाणात संत्र्याची लागवड होते. मात्र, सध्या बाजारात राजस्थान, अमरावती येथून मोठी आवक होत आहे. नेहमीप्रमाणे नगर जिल्ह्यातूनही आवक होत आहे. राजस्थान, अमरावती येथील संत्री चवीला गोड असते. तर नगर जिल्ह्यातील आंबट-गोड असतात. मार्केट यार्डातील फळ विभागात दरररोज ६० ते ८० टन आवक होत आहे.
जिल्ह्यात मोसंबीची लागवड अत्यंत कमी प्रमाणात होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तेथून मार्केट यार्डात आवक होते. सध्या संत्रीचा आंबेबहार हंगाम संपत आला असून मृगबहार हंगाम सुरू झाला आहे. आंबेबहार हंगामाची येथील बाजारात १० ते १५ टन आवक होत आहे. तर, नवीन मृगबहार हंगामातील मोसंबीची ४० ते ५० टन आवक होत आहे.
“मोसंबी ही नेहमी संत्रीपेक्षा महाग असते. मात्र, आता राजस्थान आणि राज्यातील अमरावती व नगर जिल्ह्यांतून संत्रीची मोठी आवक होत आहे. त्यामुळे सध्या बाजारात संत्री मोसंबीपेक्षा महाग आहे.” – सोनू ढमढेरे, आडतदार, मार्केट यार्ड.
घाऊक बाजारातील भाव
संत्री – १२ ते ३५ रुपये किलो
मोसंबी – ३० ते ७० रुपये किलो