पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत संपली असून, विद्यार्थ्यांना २१ मार्चपर्यत विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.
सेट परीक्षेतून पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील विद्यापीठे, कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेची आतुरतेने वाट पाहतात. यंदाची परीक्षा १५ जूनला होणार आहे.
विद्यार्थ्यांना विलंब शुल्काद्वारे २१ मार्चपर्यंत पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. २२ ते २४ मार्च या कालावधीत या अर्जांमध्ये दुरुस्ती करता येईल.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ५ जूनपासून डाउनलोड करता येईल. परीक्षेचा अर्ज भरताना ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने केले आहे.