पुणे – भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये खडकवासला मतदार संघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली. तर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून आमदार सुनील कांबळे हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत.
तर, कसबा पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या हेमंत रासने येथून पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यामुळे भाजपने सहा जागांवर अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मागील रविवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले. त्यानंतर, दुसऱ्या यादीची तब्बल सहा दिवस प्रतीक्षा कायम होती.
यामध्ये कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला येथे इच्छुकांची जास्त संख्या आणि जिंकण्याची समीकरणे याचा विचार करत उमेदवार बदलण्यात येणार असल्याची राजकीय चर्चा होती. त्यासाठी इच्छुकांनी आधी मुंबई आणि नागपूर आणि नंतर दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. मात्र, अखेर पक्षाने या तीनही ठिकाणी उमेदवार कायम ठेवले आहेत.
तापकीर, कांबळे ठरले विश्वासास पात्र
खडकवासला विधानसभा मतदार संघात पक्षातून सर्वाधिक इच्छुक होते. मात्र, या सर्वांवर मात करत तापकीर यांनी तिकिटाची बाजी मारली आहे. २०११ च्या पोटनिवडणुकीत तापकीर विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. आता चौथ्यांदा तिकीट मिळविण्यातही ते यशस्वी ठरले. तर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघात ४० ते ४५ हजारांचे मताधिक्य गृहीत धरले होते. मात्र, कांबळे यांनी ते १५ हजारांवर रोखले. या एकमेव मतदारविसंघात काँग्रेसला आघाडी मिळाल्याने कांबळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याची चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असले कांबळे पुन्हा तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
उमेदवारी कायम ठेवण्यात रासने यशस्वी
मागील वर्षी झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळाले होते. तर रासने यांनीही पुन्हा लढण्यासाठी तयारी सुरू केली होती. अखेर उमेदवारी कायम ठेवण्यात रासने यांना यश आले आहे.