पुणे – शहरातील करोना लसीकरणाचा गोंधळ कमी करण्यासाठी महापालिकेकडून 1 मेपासून प्रत्येक प्रभागासाठी दोनच शासकीय लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. एक बाजूला लसीकरण केंद्र वाढत असतानच दुसऱ्या बाजूला शहरात होणारा लसींचा पुरवठा अतिशय कमी आहे.
त्यामुळे अनेक केंद्रांवर दोन ते तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. त्यातच 1 मेपासून 18 वर्षे वयाच्या पुढील प्रत्येकास लस देण्यात येणार असल्याने गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेकडून शहरात सध्या 180 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यात, शासकीय दवाखान्यांचा समावेश असून काही प्रभागात नगरसेवकांच्या मागणीनुसारही केंद्र सुरू करण्यात आली असून प्रत्येक नगरसेवकाकडून केंद्र वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र वाढवायची झाल्यास लसींचा पुरवठा आणि आवश्यक मनुष्यबळ नेमणेही गरजेचे आहे. त्याच वेळी, कोविड केअर सेंटरमध्येही पालिकेस कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे.
तर 1 मेपासून नागरिकांना पैसे देऊन खासगी रुग्णालयातही लस मिळणार आहे. त्यामुळे महापालिका प्रत्येक प्रभागासाठी केवळ 2 केंद्र सुरू ठेवणार आहे. याशिवाय, प्रभाग 42 शहरात चारही दिशांना विखुरलेला असल्याने त्या प्रभागात प्रत्येक ठिकाणी 1 केंद्र सुरू केले जाणार आहे.
त्याबाबतचे नियोजन पूर्ण झाले असून त्यानुसार, पुढील दोन दिवसांत कार्यवाही सुरू केली जाणार आहे, तर ज्या प्रभागात 2 पेक्षा जास्त केंद्र आहेत ती बंद करून दोनच केंद्र सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. परिणामी वैद्यकीय मनुष्यबळाचे योग्य पद्धतीने नियोजन करणे शक्य होणार असून, लसीकरणही नियोजनबद्ध पद्धतीने करणे शक्य होणार आहे.
दि. 1 मेपासून प्रत्येक प्रभागासाठी केवळ दोनच लसीकरण केंद्र असतील. सुरुवातीच्या टप्प्यात जसजसा लसींचा पुरवठा वाढत जाईल त्या प्रमाणे प्रभागातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या त्या प्रभागात केंद्र वाढविण्यात येतील.
– रुबल अग्रवाल,अतिरिक्त आयुक्त.