…फक्‍त पोटाची खळगी भरली पाहिजे; बाल कामगारांची भूमिका

– संजय कडू

पुणे – “हॉटेल कामगारांसाठी लढा देणाऱ्या काही नामांकित संघटना आहेत. त्या हॉटेल कामगारांसाठी लढा देत असतात. परंतु, हॉटेलमध्ये काम करणारे हे रोजी-रोटीसाठी आलेले असतात, यामुळे ते स्वत:च्या हक्‍कासाठी लढा देण्याच्या फंदात पडत नाहीत. हेच कारण हॉटेल कामगार असंघटित असण्यामागे आहे. यासंदर्भात संघटनेव्यतिरिक्‍त कामगार आयुक्‍तांकडे दादही मागितली जाऊ शकते. कामगार आयुक्‍तांकडे बाल कामगारांसह या कामगारांसंदर्भातही अधिकार आहेत. मात्र, यासंदर्भात कायद्यात अनेक पळवाटा आहेत. अनेकदा हॉटेल कामगार लादी, भांडी व साफसफाईचे काम ठेक्‍याने घेतल्याचे सांगतात. यावर कामगार आयुक्‍त कार्यालय काहीच करू शकत नाही,’ अशी खंत कामगार कायदा अभ्यासक ऍड. अतुल दीक्षित यांनी व्यक्‍त केली.

“कायद्यानुसार बालकामगार ठेवता येत नाही, मात्र बालकामगारांची माहिती कामगार कार्यालयापर्यंत पोहोचत नाही किंवा कोणी तक्रार देण्यासही पुढे येत नाही. यामागे कामगार कार्यालय आणि हॉटेलचालकांचे साटेलोटे असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असेही ऍड. दीक्षित यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूने विचार करता विदर्भ-मराठवाडा अशा दुष्काळग्रस्त भागांतून मुले रोजीरोटीसाठी येत असतात. त्यांना राहाणे, खाणे तसेच पगारही मिळत असतो. कारवाई झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचे काय होणार? हाही प्रश्‍न उपस्थित होतो. काही हॉटेलचालक एखादी सदनिका किंवा खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये दहा ते पंधरा कामगारांची राहण्याची सोय करतात. याही परिस्थितीत काही मुले अभ्यास करून चांगले शिक्षण घेतात. यामुळे हॉटेल कामगार पोटाची खळगी भरली पाहिजे बाकी इतर फंदात पडायचे नाही, अशी भूमिका घेतलेली दिसतात.

तर दुसरीकडे त्यांच्या प्रश्‍नासंदर्भात सामाजिक व शासकीय स्तरावर कोणतेच प्रभावी काम झालेले दिसत नाही. मालकही शक्‍यतो आता बालकामगार नको, अशी भूमिका घेताना दिसतात. यासंदर्भात थेट फौजदारीचे अधिकार कामगार आयुक्‍तांना आहेत. बालकामगारासंदर्भात कारवाई झालीच, तर त्याचे पुनर्वसन कसे करणार? हा प्रश्‍न उपस्थित होतो. परदेशात बेरोजगार भत्ता मिळतो, तशी तरतूद आपल्याकडे दिसत नाही. यामुळे कामगार कायद्यात बदल होणे आवश्‍यक आहे. कामगार कायद्यात सध्याही अनेक चांगल्या तरतुदी आहेत, मात्र हा कायदा प्रभावीपणे राबवला जात नाही. यासंदर्भात जनजागृती झाल्यास हॉटेल कामगारांच्या पोटाचा प्रश्‍न सुटेल,’ असेही ऍड. अतुल दीक्षित यांनी सांगितले.
विश्रांतीही असुरक्षित

कामगारांना हॉटेलमध्येच रहायची सोय केलेली असते. मात्र, त्यांना रहाण्यासाठी वेगळी खोली नसते. त्यांना दिवसभर ज्या टेबलवर सर्व्हिस दिली जाते, तोच टेबल रात्री साफ करून त्यावर अंथरुण करून झोपावे लागते. यामुळे ग्राहक गेल्यानंतर साफसफाई व जेवण करेपर्यंत रात्रीचे बारा वाजलेले असतात. मोठ्या प्रमाणात असलेला कमर्शिअल सिलिंडरचा साठा, गंजलेल्या शेगड्या आणि शेवटच्या घटना मोजणारी गॅस पाइपलाइन अशा ठिकाणीच स्वत:च बेड टाकून असुरक्षित वातावरणात राहावे लागते. एखादे मोठे हॉटेल असेल तरच कर्मचाऱ्यांसाठी वेगळी खोली दिली जाते.

लादीवाले, मोरीवाले आणि भांडेवाले
हॉटेल व्यवसायात अल्पवयीन कामगार हे लादी पुसण्याचे, भांडी धुण्याचे आणि खरकटी भांडी टेबलवरून उचलण्याचे काम करतात. त्यानंतर वेटर व कॅप्टन ही वर्गवारी येते. मात्र, ही वर्गवारी बाहेर पडू दिली जात नाही. सर्वसामान्य ग्राहकांना मोरीत काम करणारे बालकामगार दृष्टीस पडत नाहीत. हे कामगार पोट भरायला आलेले असतात. यामुळे ते कोणत्याही संघटेनेकडे जात नाहीत, पगार कमी असला आणि अत्याचार होत असला तरी ते घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे यातून बाहेर पडत नाहीत, अशी स्थिती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.