पुणे- विद्यापीठाच्या संलग्नित प्रत्येक महाविद्यालयातील पदवीपूर्व प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्याचा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या विद्या परिषदेच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील पदवीपूर्व प्रवेशाच्या सीईटीवर विचारमंथन होणार आहे.
विद्यापीठाची दोन दिवस झालेल्या अधिसभेत दादाभाऊ शिनलकर यांनी प्रत्येक महाविद्यालयातील पदवी प्रवेशासाठी सीईटी आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडत सर्वांचे लक्ष वेधले होते. यापूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगाने काही दिवसांपूर्वी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना पदवीपूर्व प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता अधिसभेतही हा प्रस्ताव मान्य झाल्याने सीईटीच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावावर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, “हा प्रस्ताव अतिशय योग्य आहे. हा विषय विद्या परिषदेच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे ते म्हणाले. विद्या परिषदेच्या बैठकीत सीईटीवर अभ्यासपूर्वक चर्चा होईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता महाविद्यालयातील पदवीपूर्व प्रवेशाच्या सीईटीसंदर्भात विद्यापीठ काय निर्णय घेणार आहे, हे पाहावे लागणार आहे.’