पुणे – प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन अर्जास मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय : शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रक्रिया

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील पदव्युत्तर व पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना दि. 3 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

विद्यापीठातील विभागांमध्ये असलेल्या विविध पदव्युत्तर, पदवी, एकात्मिक, आंतरविद्याशाखीय तसेच पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 1 ते 25 मे असा कालावधी होता. मात्र अजूनही काही विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्याचा विचार करून अर्ज करण्यासाठी दि.3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठातील पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश मात्र संबंधित विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑफलाइन प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहेत. प्रवेशांमध्ये तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईनद्वारे घेण्यात येत आहे. विद्यापीठ परिसरातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये मिळून 80 पेक्षा जास्त पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम चालविते जातात. त्याखेरीज विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मिळून सुमारे 70 पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. संबंधित विभागांमध्ये होणाऱ्या परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जाणार आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दूरध्वनी क्रमांक नेहमी “बिझी’
विद्यापीठाच्या सर्व पदव्युत्तर विभागांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येत असून, हे पहिलेच वर्ष आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी उद्‌भवल्यास एक दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी देण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन होण्यासाठी दिलेले दूरध्वनी क्रमांक नेहमी “बिझी’ असतात. फोन केला तर लागत नाही आणि लागला तरी उचलला जात नाही, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळत नाही. त्यासाठी योग्य व्यवस्था व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×